पिंपरी-चिंचवडमधील लाखो शिधापत्रिकाधारकांना मोठा धक्का बसला आहे. ५ नोव्हेंबरपासून सुरू होणारे धान्य वाटप, रेशन दुकानांमध्ये ज्वारीचा साठा न पोहोचल्यामुळे पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. या महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना गव्हासोबतच १ किलो ज्वारी मिळणार असल्याने, ज्वारीशिवाय वाटप करणे शक्य नाही, अशी भूमिका रेशन दुकानदारांनी घेतली आहे.
शहरातील ४ लाख ९३ हजार ८७४ शिधापत्रिकाधारकांसाठी ५.८३ टन ज्वारीची मागणी आहे. गहू आणि तांदूळ दुकानदारांना प्राप्त झाले असले तरी, अद्याप ज्वारीचा साठा आलेला नाही. रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष शंकरराव अतेकर यांनी ‘वितरण मशीनवर ज्वारी दाखवली गेली आहे, मात्र प्रत्यक्षात ज्वारी मिळताच लोकांना धान्य वाटप सुरू करता येईल,’ असे स्पष्ट केले आहे.
परिणामी, चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही कार्यालयांतर्गत ज्वारीचा साठा (अनुक्रमे १.६९ टन, २.६३ टन आणि १.५१ टन) येण्याची प्रतीक्षा आहे.
सुदैवाने, प्रशासनाने ‘दोन दिवसांत ज्वारीचा साठा येण्याची शक्यता’ वर्तवली असून, त्यानंतर लगेच धान्य वाटप सुरू होईल, अशी आशा आहे. सोमवार वगळता दररोज धान्य वाटप केले जाईल. मात्र, ज्वारीअभावी गोरगरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यास विलंब होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे












































