Pavana river blue line impact on Pimpri residents: पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्याने (DP) पिंपरीकरांची झोप उडवली आहे. विशेषतः पवना नदीच्या ‘निळ्या आणि लाल रेषे’मुळे अनेक रहिवाशांना आपली घरे किंवा जागा बाधित होण्याची भीती वाटू लागली आहे. पवना नदीची निळी रेषा तर पिंपरी रेल्वेलाइन आणि जिजामाता रुग्णालयापर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे नदीकाठच्या मोकळ्या जागांवर टाकण्यात आलेल्या आरक्षणांमुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरीचा मोठा भाग आधीच एमआयडीसी आणि लष्कराच्या डेअरी फार्मसाठी आरक्षित आहे. आता उर्वरित मोजक्या जागेवरही विकास आराखड्यात आरक्षण टाकण्यात आले आहे. एम्पायर काळेवाडीपासून सुरू होणारे पिंपरीचे क्षेत्र पवना नदीच्या हद्दीपर्यंत विस्तारलेले आहे. धक्कादायक म्हणजे, नदीची निळी रेषा २५ टक्के क्षेत्र बाधित करत असून, ती जिजामाता रुग्णालय आणि म्हाडाजवळील खेळाच्या मैदानापर्यंत पोहोचली आहे. यामुळे नाल्यांच्या कडेला असलेले हिरवेगार क्षेत्र गायब झाले आहे. दुसरीकडे, पिंपरीतील पूर्वी शेती असलेल्या भागांमध्ये आता रहिवासी झोन प्रस्तावित करण्यात आले आहेत.
स्थानिकांचा आरोप आहे की, ६६ गावांचा भौगोलिक आणि सद्यःस्थितीचा अभ्यास न करताच हा आराखडा तयार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही किंवा त्यांच्या सूचनांचा अंतर्भावही करण्यात आला नाही. आराखड्यात अनेक अनावश्यक आरक्षणे प्रस्तावित केली असून, मोकळ्या जागांवरही आरक्षणे टाकण्यात आली आहेत. यामुळे आधी लष्कराचे, नंतर एमआयडीसीचे आणि आता विकास आराखड्याचे पिंपरीकरांना फटके बसत आहेत. चुकीच्या आरक्षणांविरोधात हरकती नोंदवण्याचा निर्धार स्थानिकांनी केला आहे.
या आराखड्यात पिंपरीमध्ये प्राथमिक शाळा, मैदाने, प्रसूतिगृह, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमी घाट, भाजी मंडई, महामार्गावर मेट्रो पार्किंग, पोलिस ठाणे, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आणि नदीकाठी खेळाची मैदाने प्रस्तावित आहेत. ही आरक्षणे आवश्यक असली तरी, त्यांची अंमलबजावणी करताना स्थानिकांचे हित जपले जाईल का, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे














































