दिवाळी सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) ‘मनमानी‘ भाडे आकारणाऱ्या खासगी बसमालकांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. शासनाने निश्चित केलेल्या दीडपट भाड्यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या बसमालकांवर आता थेट ‘मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा आरटीओने दिला आहे.
गुरुवारी (दि. ९) पुणे येथे बस ओनर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत केवळ भाड्यावरच नाही, तर रस्ता सुरक्षिततेवरही भर देण्यात आला. बसचालकांनी वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, धोकादायक पद्धतीने वाहन उभे करू नये आणि वाहनाचे सर्व आवश्यक कागदपत्रे व सुस्थिती तपासावी, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
जादा भाडे आकारल्यास ‘या’ क्रमांकावर करा तक्रार:
प्रवाशांकडून दीडपट भाड्यापेक्षा जास्त आकारणी झाल्यास किंवा प्रवासादरम्यान इतर कोणतीही अडचण आल्यास, प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाचा फोटो व्हॉट्सअॅप क्रमांक ८२७५३३०१०१ किंवा rto.12-mh@gov.in या ई-मेलवर पाठवून तक्रार नोंदवावी, असे आवाहन आरटीओने केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































