पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो दाखले ‘सर्व्हर’च्या विळख्यात; विद्यार्थी आणि पालकांची धावपळ!

24
Students and Parents Rush Certification Document Delays
हजारो दाखले 'सर्व्हर'च्या विळख्यातl;

Students and Parents Rush Certification Document Delays: नोकरी, शाळेचे प्रवेश किंवा परीक्षा असो, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला किंवा नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांची गरज सर्वांनाच भासते.
मात्र, पिंपरी-चिंचवडमधील अपर तहसील कार्यालयात सध्या ‘सर्व्हर डाउन’च्या तांत्रिक अडचणीमुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांची धावपळ उडाली आहे. तब्बल ४,८६२ दाखले प्रलंबित असल्याने आवश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत,
ज्यामुळे अनेकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

शासनाने दाखल्यांसाठी डिजिटल प्रणाली आणली असली, तरी सरकारी सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. १ एप्रिल ते ३१ मे २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत तहसील कार्यालयाने ३३,२३१ दाखले वितरित केले असले, तरी २० मेपासून सर्व्हरमध्ये वारंवार अडथळे येऊ लागले आहेत. यामुळे कागदपत्रांसाठी अर्ज केलेल्यांना अनेकदा कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.

या समस्येवर अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, सर्व्हरचे अपडेट सुरू असल्यामुळे दाखले मिळण्यास विलंब होत आहे. सध्या प्रणाली रात्रीच्या वेळी सुरळीत चालत असून, त्या वेळेत काम केले जात आहे. पुढील आठवड्यात सर्व प्रलंबित दाखले वितरित होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

दाखल्यांसाठी किचकट प्रक्रिया;

नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया विशेषतः वेळखाऊ आणि किचकट आहे. यासाठी ओळखपत्र, १५ वर्षांपूर्वीचा रहिवासी पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, तीन वर्षांचे तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, १९६९ पूर्वीचा वडील, चुलते, आत्या, आजोबा यांपैकी एकाचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच लग्नापूर्वी आणि नंतर नाव बदलल्याचा पुरावा अशी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ती मिळवण्यासाठीही वेळ लागतो, ज्यामुळे अर्जदारांना दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागते.

या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांची गैरसोय होत असली तरी, प्रशासनाकडून लवकरच ही समस्या दूर करून सर्व प्रलंबित दाखले वितरित केले जातील अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे