Cyber & Investment fraud in Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहर आणि आसपासच्या परिसरात सायबर गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार महिन्यांत या सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ कोटी २५ लाख ८८ हजार ४८३ रुपयांची फसवणूक केली आहे! राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत या संदर्भात तब्बल ७९५० तक्रारी दाखल झाल्या आहेत, ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीच्या घटनांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणे शेअर मार्केटमध्ये आकर्षक नफ्याचे आमिष दाखवून करण्यात आली आहेत. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा थेट फोन करून लोकांना संपर्क साधला जातो. त्यानंतर, मोठ्या आणि प्रतिष्ठित कंपन्यांच्या नावाचा वापर करून, हुबेहूब बनावट ॲप्सच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी दबाव आणला जातो. जास्त नफ्याच्या लालसेपोटी अनेकजण या जाळ्यात सहजपणे अडकतात.
सायबर पोलीस स्टेशनमध्ये दररोज सरासरी ४५ ते ५० तक्रारी दाखल होत आहेत, हे आकडेवारी गंभीर परिस्थिती दर्शवते. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या गुन्हेगारांवर मोठी कारवाई करत आतापर्यंत १० कोटी ७६ लाख सात हजार ७८६ रुपये गुंतवणूकदारांना परत मिळवून दिले आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा कोणत्याही बनावट ॲपवर विश्वास ठेवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये. फसवणूक झाल्याचा संशय आल्यास त्वरित राष्ट्रीय साइबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल या संकेतस्थळावर किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. फसवणूक झाल्यानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गोल्डन अवर’ खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्वरित तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.
सायबर गुन्हेगारांचे हे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालले आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आणि कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडणे गरजेचे आहे. आपली जागरूकता आणि सतर्कता हीच या सायबर गुन्ह्यांवरील प्रभावी उपाययोजना आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,सोनाली तांबे