अस्वच्छ खाद्यपदार्थांमुळे आरोग्याला धोका पुणेकरांनीच घ्यायची काळजी!

सणासुदीच्या काळात, विशेषतः गणेशोत्सवात रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा मोह कोणालाही होतो. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये एका माध्यम संस्थेने केलेल्या पाहणीत या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पिंपरी, भोसरी, चिंचवड, निगडी आणि इतर भागांतील स्टॉल्सवर गंभीर स्वरूपाची अस्वच्छता आढळून आली आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झाला आहे. या पाहणीनुसार, अनेक विक्रेते पदार्थ तयार करण्यासाठी शिळ्या आणि सडलेल्या भाज्या वापरत आहेत.

याव्यतिरिक्त, आरोग्याला हानिकारक असे भेसळयुक्त रंग आणि अशुद्ध पाण्याचा वापर सर्रास होत आहे. वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा तळण्यासाठी वापरले जात आहे. स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. विक्रेते हातमोजे किंवा मास्कचा वापर करत नाहीत, तर काहीजण तंबाखू खाऊन आणि खोकून खाद्यपदार्थ तयार करताना आढळले. यामुळे खाद्यपदार्थांमध्ये जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे.

अन्न-औषध प्रशासनाने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सर्व स्टॉल्सची नियमित तपासणी करणे शक्य नसल्याचे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत, नागरिकांनी स्वतःच जागरुक होणे आवश्यक आहे. उघड्यावरील पदार्थ खाताना त्यांच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची खात्री करावी. ताजे पदार्थच खावेत आणि जुने किंवा शिळे पदार्थ टाळावेत, असा सल्ला वायसीएम रुग्णालयातील डॉ. हर्षल पांडवे यांनी दिला आहे. ही परिस्थिती पाहता, प्रशासनाने यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे