पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीपूर्वी शहराच्या मतदारसंख्येत धक्कादायक वाढ नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१७ नंतर तब्बल पावणेनऊ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी, मतदारांची संख्या ५ लाख २१ हजार ८०२ ने वाढून १७ लाख १३ हजार ८९१ इतकी झाली आहे. २०१७ मध्ये ही संख्या ११ लाख ९२ हजार ८९ होती. लोकवस्तीतील वाढ आणि नवमतदारांची मोठी भर हे या विक्रमी वाढीचे मुख्य कारण मानले जात आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७.२७ लाख होती, जी आता ३० लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. वाढत्या लोकसंख्येचा थेट परिणाम मतदारसंख्येत दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी शहराला १ ते ३२ प्रभागांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक प्रभागात ४५ ते ५५ हजार मतदारसंख्या असणार आहे.
सध्या उपलब्ध झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारीनुसार, चिंचवडमध्ये सर्वाधिक ६,७६,६३८ मतदार आहेत, तर भोसरीमध्ये ६,२४,१५२ आणि पिंपरीमध्ये ३,९९,८११ मतदार आहेत. एकूण मतदारांमध्ये ९,०५,७२८ पुरुष, ८,०७,९६६ महिला आणि १९७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
महापालिका उपायुक्त सचिन पवार यांनी माहिती दिली आहे की, विधानसभा मतदारयादीतून ३२ प्रभागनिहाय मतदारयाद्या फोडण्याचे काम वेगात सुरू असून, ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. मात्र, मतदारयादीतील गोंधळामुळे अनेक नागरिकांची नावे वगळली गेल्याच्या तक्रारी आल्या असून, यामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. ही निवडणूक शहरातील वाढलेल्या लोकशक्तीची चाचणी ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे











































