Pimpri-Chinchwad suspicious murder & suicide case: एका क्षुल्लक संशयाने एका सुखी संसाराची राखरांगोळी झाली! पत्नीच्या मोबाईलवर आलेला एक साधा मेसेज एका भयानक घटनेला कारणीभूत ठरला. ‘झोपू का मग?’ या एका मेसेजमुळे संतप्त झालेल्या पतीने आपल्या सहा वर्षांच्या निष्पाप मुलीसमोर पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर स्वतःही जीवन संपवले.
पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कांचन शरद चितळे (वय २६, रा. रूपीनगर, तळवडे) असे दुर्दैवी पत्नीचे नाव आहे, तर शरद रूपचंद चितळे (वय ३३, रा. रूपीनगर, तळवडे) असे पत्नीचा खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. २०१८ मध्ये कांचन आणि शरद विवाहबंधनात अडकले होते आणि त्यांना परी नावाची एक गोंडस मुलगी आहे. रूपीनगरमध्ये त्यांचे आनंदी कुटुंब होते. कांचन ‘आशा वर्कर’ म्हणून कार्यरत होती, तर शरद एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.
परंतु, गेल्या १५ दिवसांपासून शरदला कांचनच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल संशय होता. त्याने याबद्दल कांचनला अनेकदा समजावले, तसेच आपल्या नातेवाईकांनाही सांगितले. मात्र, कांचनच्या वागण्यात कोणताही बदल दिसून आला नाही. १२ एप्रिलच्या रात्री शरद जेव्हा कामावरून घरी आला, तेव्हा त्याने कांचनच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून कॉल येताना पाहिला. त्याने कांचनला त्या नंबरवर परत कॉल करण्यास सांगितले, परंतु तिने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि याच दरम्यान कांचनच्या मोबाईलवर त्याच नंबरवरून ‘झोपू का मग?’ असा एक संदेश आला. या मेसेजमुळे शरदचा राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात कांचनला मारहाण करण्यास सुरुवात केली. विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून त्याने पत्नीला संपवण्याचा आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या प्रयत्नात बेशुद्ध झालेल्या शरदला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना पोलिसांनी १६ एप्रिल रोजी त्याचा जबाब नोंदवला. आपल्या जबाबात शरदने पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांच्या संशयाबद्दल आणि त्याच कारणामुळे पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, १३ एप्रिलच्या सकाळी कांचन झोपलेली असताना शरदने तिचा गळा दाबला आणि नंतर नायलॉनच्या दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच दोरीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बेशुद्ध झाला.
या हृदयद्रावक घटनेवेळी त्यांची सहा वर्षांची मुलगी परी घरातच होती. जेव्हा शरदने कांचनचा गळा दाबण्यास सुरुवात केली, तेव्हा परी घाबरली आणि तिने रडत ‘पप्पा मम्मीला का मारता? नका मारू,’ असे म्हणायला सुरुवात केली. मात्र, शरदने तिच्या रडण्याकडे आणि बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ती रडतच घराबाहेर पडली.
परीला रडताना पाहून शेजारची एक महिला घरात आली आणि तिला शरद पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तिने त्वरित आरडाओरडा करून इतरांना बोलावले आणि नागरिकांनी मिळून त्याला खाली उतरवले. या घटनेची नोंद चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे