पिंपरी चौक-इंदिरा गांधी पूल रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणांवर कारवाईची तयारी

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते इंदिरा गांधी उड्डाणपूल या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यानंतर या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा प्रमुख रस्ता मोकळा श्वास घेणार असून, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपथही तयार केले जातील.

या रस्त्यावर अतिक्रमणांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. दुकानांनी रस्त्यावरच वाढीव बांधकाम केले आहे, तर हातगाड्या आणि वाहनांची बेशिस्त पार्किंग यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही घडत आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे.

महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त पूजा दुधनाळे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा संपल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेली अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेतली जाईल. त्यानंतर, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पदपथांची निर्मिती केली जाईल. ‘ह’ क्षेत्रीय स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे यांनी सांगितले की, पदपथ तयार करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल आणि या संपूर्ण प्रक्रियेला साधारण एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.

सध्या या परिसरात पदपथ नसल्याने नागरिक नाराज आहेत. परंतु आता महापालिकेने ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिल्याने, या भागातील वाहतूक आणि पादचाऱ्यांची सुरक्षा सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे