Pimpri HA Company Fire: पिंपरीतील एच.ए. कंपनीत बुधवारी (दि. २६) दुपारी साडेतीनच्या सुमारास भंगार साहित्याला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या दहा बंबांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र या घटनेने कंपनीच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत आणि झाडेझुडपे यामुळे आग अधिक भडकली, ज्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.
अग्निशमन दलाच्या नोटिशीकडे दुर्लक्ष
यापूर्वी ४ जून २०२० रोजी एच.ए. कंपनीत आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाने कंपनीला नोटीस बजावली होती. कंपनीतील ज्वलनशील साहित्य, असुरक्षित विद्युत वायरिंग आणि सुरक्षारक्षकांचे अपुरे प्रशिक्षण यांसारख्या गंभीर त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या. मात्र, कंपनीने या नोटिशीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
आगीचे कारण आणि सुरक्षेचा प्रश्न;
बुधवारी लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही स्थानिक नागरिकांच्या मते, रेल्वेमार्गालगतचे गवत जाळताना उडालेल्या ठिणगीमुळे ही आग लागली. मात्र, कंपनीच्या आवारात ज्वलनशील साहित्य असल्याने आग झपाट्याने पसरली. या घटनेमुळे कंपनीच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नागरिकांची मागणी आणि प्रशासनाची भूमिका
परिसरातील नागरिकांनी कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
एच.ए. कंपनीची भूमिका
या घटनेबाबत एच.ए. कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, कंपनीने या घटनेतून धडा घेऊन तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे