प्राधिकरणमध्ये ‘मेघ मल्हार’ महोत्सवाचा अनोखा नृत्याविष्कार

कला आणि संस्कृतीचा संगम साधत प्राधिकरणमध्ये उद्या (गुरुवार, दि. ४) ‘मेघ मल्हार महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव नृत्यकला मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, यामध्ये गायन, वादन आणि नृत्याचा अप्रतिम मिलाफ रसिकांना अनुभवता येणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा आणखी वाढणार आहे. ही माहिती प्रसिद्ध नृत्यांगना तेजश्री आडगे यांनी दिली.

प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होईल. महोत्सवाच्या सुरुवातीला अंजली पोहनकर यांचे कथ्थक नृत्य सादर केले जाईल. त्यानंतर, ताल वाद्यांची जुगलबंदी होणार आहे. यामध्ये मुक्ता रास्ते (तबला), अनुजा बोरुडे (पखवाज) आणि अदिती गराडे (हार्मोनियम) यांचा सहभाग असेल.

याशिवाय, शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्यांसाठी गौरी पठारे यांचे शास्त्रीय गायन हे विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यांना सुलक्षणा फाटक आणि सुप्रिया जोशी साथ देणार आहेत. या महोत्सवातून कलाकारांना एक उत्तम व्यासपीठ मिळणार असून, रसिकांनाही एकाच ठिकाणी विविध कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

पावसाळ्याच्या वातावरणात संगीताचा हा अनुभव
मनमोहक ठरेल, अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे