“Massive Crowd in Pimpri Against Commissioner! Strong Demand for Atrocity Case”
पिंपरीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. बनसोडे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनावर जातीय भावनेतून अवमान केल्याचा आरोप केला असून, आयुक्तांची हकालपट्टी करून त्यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
हा मोर्चा मोरवाडी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर काढण्यात आला. गेल्या गुरुवारी (७ ऑगस्ट) आंदोलनादरम्यान बनसोडे महापालिकेत निवेदन देण्यासाठी गेले होते. प्रोटोकॉलनुसार आयुक्त किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते निवेदन स्वीकारणे अपेक्षित होते, मात्र कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे प्रशासनाने जाणूनबुजून अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आयोजित झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या सभेत कार्यकर्त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. बनसोडे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांचा सतत अपमान होत असल्याचा आरोप करत आयुक्तांनी सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी सांगितले की, ते लवकरच पालकमंत्री अजित पवार यांना भेटून या प्रकरणाचे निवेदन देतील. या मोर्चामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, यापुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































