पुणे-पिंपरीत आगीचा ‘भडका’; दोन महिन्यात वाहनांना धोक्याची घंटा!

Increasing incidents of fire in Pune-Pimpri: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मार्च आणि एप्रिल महिन्यात वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. कधी अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वालांनी गाड्या वेढल्या, तर कधी घातपाताच्या संशयाने या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. यामुळे आपल्या लाडक्या वाहनांची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच, ८ तारखेला मुंबई-पुणे महामार्गावर दापोडीजवळ एका धावत्या कारने अचानक पेट घेतला.
मेट्रो स्टेशनजवळच्या ग्रेड सेपरेटरमध्ये घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीच्या धोक्याची
तीव्रता स्पष्ट झाली. त्यानंतर, १७ एप्रिल रोजी पुणे-सातारा महामार्गावर खेड शिवापूरजवळ एका व्होल्व्हो बसला आग लागली. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे या दुर्घटनेतही कोणालाही इजा झाली नाही.

शहराच्या मध्यवर्ती भागातही आगीच्या घटनांनी डोके वर काढले. २१ एप्रिल रोजी पुण्यातील कमांड हॉस्पिटलजवळ सकाळी एका कारला आग लागली. या घटनेतही जीवितहानी टळली असली, तरी शहरात दिवसाढवळ्या अशा घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.

पिंपरी अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी गौतम इंगवले यांनी या घटनांविषयी माहिती देताना सांगितले की, “वाहनांना आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात. इंधन गळती, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये शॉर्टसर्किट किंवा एखादा मोठा अपघात हे देखील आगीचे कारण ठरू शकते. अशा परिस्थितीत त्वरित अग्निशमन दलाला संपर्क साधावा आणि स्वतःला सुरक्षित ठेवावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक वाहन मालकाने प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या वाहनाची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.”

मार्च-एप्रिल महिन्यात घडलेल्या या आगीच्या घटना पाहता, वाहन मालकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
आपल्या वाहनांची नियमित देखभाल करणे आणि कोणतीही असामान्य बाब निदर्शनास आल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे हेच या धोक्यावर मात करण्याचे प्रभावी शस्त्र आहे. निष्काळजीपणा टाळल्यास अनेक संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकतात, हे या घटनांमधून शिकण्यासारखे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे