भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी पिंपरी चौकातील त्यांच्या पुतळा स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमतात. या पार्श्वभूमीवर, आज, शनिवार, ६ डिसेंबर रोजी, दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत पिंपरी परिसरातील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी कोणत्याही गैरसोयीपासून वाचण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घोषित पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन पिंपरी पोलिसांनी केले आहे.
खालील प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी असेल आणि त्यांचे पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत
- महावीर चौक (चिंचवड) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पिंपरी) दरम्यानचा सेवारस्त्यावर प्रवेश बंद.
- पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी डी-मार्ट इन-ग्रेड सेपरेटरमार्गे प्रवास करावा.
- नाशिक फाटा चौक (कासारवाडी) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यानचा सेवारस्त्यावर प्रवेश बंद.
- पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन तसेच खराळवाडी येथील एच. पी. पेट्रोल पंपासमोरून ग्रेड सेपरेटरमार्गे इच्छितस्थळी जावे.
- स्व. इंदिरा गांधी पूल (पिंपरी रेल्वे स्थानक) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान प्रवेश बंद.
- पर्यायी मार्ग: मोरवाडी चौकामार्गे जावे.
- नेहरूनगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान प्रवेश बंद.
- पर्यायी मार्ग: एच. ए. कॉर्नर बसथांबा ते मासूळकर कॉलनीमार्गे इच्छितस्थळी जावे.
हा वाहतूक बदल केवळ आजच्या (६ डिसेंबर) विशिष्ट वेळेसाठी लागू आहे. सर्व नागरिकांनी शांतता आणि सहकार्याची भूमिका घेऊन, बदललेल्या नियमांचे पालन करत, महामानवाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
