पियूष गोयल यांना शिवसेनेचा टोला

मुंबई, दि. २५ मे २०२०: उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी केली होती. या मागणीला अनुसरून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी टोमणा मारत एक ट्विट केले होते. ते म्हणाले होते की, आम्ही अतिरिक्त गाड्या पाठवू परंतु आधी प्रमाणे त्या रिकाम्या धावू नये म्हणजे झाले. तसेच ते असे म्हटले होते की महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की त्यांनी रेल्वे गाड्यांसाठी ची यादी पाठवली आहे परंतु अद्याप ती मध्य रेल्वेकडे आलेली नाही. त्यामुळे रेल्वेगाड्या मिळण्यासाठी आधी यादी तर पाठवा.

याला प्रतिउत्तर देत संजय राऊत म्हणाले की, ‘गोयल हे राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचे, मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत. हे केंद्रातील प्रत्येक मंत्र्याने समजून घ्यायला हवं. महाराष्ट्रातून याआधी न मागताही अनेक गाड्या सुटलेल्या आहेत. नागपूर, पुण्यातून सुटल्या आहेत, त्याची यादी आमच्याकडे आहे. १४ मे रोजी सुटलेल्या नागपूर-ऊधमपूर ट्रेनसाठी कुठली यादी घेतली होती? आधी ट्रेन, नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल का ? आता यादी कसली मागताय? राज्य सरकारशी संवाद ठेवाल तर त्याची गरज लागणार नाही. राज्यसभेत तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका,’ असं राऊत यांनी सुनावलं आहे. सध्याचं वातावरण पाहता त्यांची चीडचीड होणं स्वाभाविक आहे, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.

उत्तर प्रदेशातील मजूर हवे असतील तर यापुढं आमच्या सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असं वक्तव्य यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘तसं असेल तर आम्हाला देखील इथं एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज तयार करावं लागेल. सर्वांना पारखून घ्यावं लागेल. खरंतर यूपीतील मजूर त्यांच्या गावात नीट पोहोचले का याकडं योगींनी लक्ष द्यायला हवं. दीड महिना महाराष्ट्रात मजुरांची कशी व्यवस्था केली होती याचे व्हिडिओ आम्ही पाठवू शकतो. भाजप वगळता सर्व राज्यांनी महाराष्ट्र सरकारचं कौतुकच केलंय. महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे झिंदाबादच्या घोषणाही दिल्या होत्या. कदाचित ते योगींना आवडलं नसेल.’

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा