नेपाळमध्ये विमान कोसळले, भीषण अपघातात ३२ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

काठमांडू, १५ जानेवारी २०२३ : नेपाळमध्ये रविवारी सकाळी एक मोठा विमान अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर यति एअरलाइन्सचे ATR-72 विमान कोसळले. या भीषण अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून ३२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या यति एअरलाईन्सचे विमान कोसळले असून, पोखरा परिसराजवळ ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात ७२ जण होते. यामध्ये ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि बचावकार्य करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत असल्याचे दिसत आहे. तसेच या अपघातात मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात दहा विदेशी नागरिक प्रवास करीत होते. यामध्ये पाच भारतीय होते.

यती एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, आग विझवण्याचे प्रयत्न वेगात सुरु आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत सोळा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बचाव कार्यात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा