उस्मानाबाद, दि. २८ जून २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा या ठिकाणच्या तहसील कार्यालयांत काल दिनांक २७ जून रोजी सर्व विभागीय अधीकाऱ्यांसह आढावा बैठक घेण्यात आली. खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे वेगवेगळे बी बियाणे, खते यांची उपलब्धता, वाटप बियाणांची गुणवत्ता, तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे खरीप हंगामासाठी असणारे पीक कर्ज, वितरण तसेच कोवीड-१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना या सर्व संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला.
हा आढावा घेत असताना काही गोष्टी देखील निदर्शनास आल्या. पिक कर्ज वाटपात होत असलेली दिरंगाई करणाऱ्या बँकांवर तसेच बोगस बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश ही प्रशासनाला देण्यात आले.
सोबतच ज्या शेतकऱ्यांच्या शेतात या बोगस बी बियाणांमुळे पिकांची उगवण झालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर गुणवत्तापूर्ण बी बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे तसेच त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याचे वितरण करावे असेदेखील निर्देश दिले.
या बैठकीत खासदार श्री ओमराजे निंबाळकर, आमदार श्री तानाजी सावंत, आमदार श्री कैलास घाडगे पाटील, जि. प.उपाध्यक्ष श्री धनंजय सावंत, जि. प. कृषी सभापती श्री दत्ता अण्णा साळुंखे, जिल्हाप्रमुख श्री लटके सर, तहसीलदार सौ उषाकिरण श्रुंगारे मॅडम, परंडा तहसीलदार श्री तुषार बोरकर,गटविकास अधिकारी चकोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद, पोलीस निरीक्षक श्री खनाळ यांच्यासह विविध विभागांचे अधीकारी देखील उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड