शेतकऱ्यांना शुद्ध अनुवंशिकतेचे ऊस बेणे देण्याचे नियोजन – हर्षवर्धन पाटील

इंदापूर, १४ जुलै २०२० : राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.१४) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावला भेट दिली. तेथे त्यांनी ऊस पिकावर सुरू असलेल्या विविध संशोधनांची, नवीन वाणांची व आधुनिक पीक पद्धतीची माहिती घेतली. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात , शुद्ध अनुवंशिकता असलेले प्रमाणित दर्जाचे विविध वाणांचे ऊस बेणे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यासाठी पाडेगाव संशोधन केंद्र येथून ऊस पिकाचे मूलभूत(ब्रीडर) बियाणे हे पायाभूत बिजोत्पादनासाठी, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी- महात्मा फुलेनगर व निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर, या दोन्ही कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पायाभूत बेण्यांपासून तयार झालेले शुद्ध गुणवत्तेचे प्रमाणित बियाणे हे ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले जाणार आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुद्ध गुणवत्तेचे बेणे वापरल्याने उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांचा चांगला आर्थिक फायदा होणार आहे,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या भेटीप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी एम.एस.१०००१ ,को. ८६०३२, फुले ०२६५ तसेच चाचणी सुरू असलेल्या को. ९०५७ या वाणांच्या उस प्रक्षेत्रांना भेटी देऊन संशोधनाची माहिती घेतली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार ऊस विशेष तज्ञ डॉ. भरत रासकर यांनी केला.

याप्रसंगी कार्यालयामध्ये ऊस पिकावरील संशोधन व नवीन वाण यासंदर्भातील उत्कृष्ट सादरीकरण डॉ. भरत रासकर यांचेसह डॉ. सुभाष घोडके, कृषी विद्यावेत्ता डॉ. तांबे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे समोर केले. या भेटीच्या वेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, राजेंद्र कोरटकर, कर्मयोगी कारखान्याचे शेतकी अधिकारी एस.जी.कदम, ऊस पुरवठा अधिकारी जी.के.पोळ, नीरा-भीमा कारखान्याचे ऊस विकास अधिकारी डी.एम. लिंबोरे आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी :निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा