पुणेकरांनो, स्वप्नातील घर होणार साकार! ‘पंतप्रधान आवास योजने’ला तुफान प्रतिसाद, ४ हजारांहून अधिक अर्ज दाखल

38
A modern housing complex under the PM Awas Yojana, featuring multiple high-rise apartment buildings with balconies and greenery. A signboard in the foreground displays
'पंतप्रधान आवास योजने'ला तुफान प्रतिसाद.

Punekars dream home will come true: पुणे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी आणि वडगाव खुर्द यांसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये तब्बल ४ हजार १७३ घरे बांधण्याचे पुणे महापालिकेने नियोजन केले आहे. या योजनेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अवघ्या काही दिवसांतच ४ हजार ६६६ हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

शहरातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर असावे, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘पंतप्रधान आवास योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, पुणे महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी वडगाव बुद्रुक, खराडी आणि हडपसर भागांत २ हजार ९१८ घरांचे यशस्वी वाटप करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात पुणे शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये घरे बांधली जाणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

या योजनेअंतर्गत घरांसाठीची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत असून, नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचवण्यावर भर देण्यात आला आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुणे महापालिकेने या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.

‘पंतप्रधान आवास योजना ०.२’ च्या माध्यमातून पुणे शहरातील हजारो कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार असून, शहराच्या विकासातही या योजनेचा मोठा हातभार लागणार आहे. या योजनेमुळे केवळ घरांचे स्वप्नच साकार होणार नाही, तर पुणे शहरातील सामाजिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा