PM मोदी कारगिल मध्ये दाखल, सलग ९व्या वर्षी लष्कराच्या जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

J-K, २४ ऑक्टोंबर २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये पोहोचले आहेत. लष्कराच्या जवानांसोबत ते येथे दिवाळी साजरी करणार आहेत. पंतप्रधान गेल्या आठ वर्षांपासून लष्करातील जवानांसोबत दीपावलीचा सण साजरा करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून ते नेहमीच सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे पोहोचले.

याआधी पंतप्रधान मोदी दिवाळीच्या सणावर सतत वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचत असतात. २१ ऑक्टोबरला ते पहिल्यांदा बाबा केदारनाथ आणि बद्रीनाथच्या दर्शनासाठी आले होते. यानंतर २३ ऑक्टोबरला त्यांनी अयोध्येच्या दीपोत्सवाला हजेरी लावली. यासोबतच अयोध्येला पोहोचल्यानंतर त्यांनी रामलला विराजमान यांचेही दर्शन घेतले.

आतापर्यंत सीमेवरील विविध भागात जाऊन पंतप्रधानांनी लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जाणून घ्या, गेल्या ८ वेळा दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी कधी आणि कुठे पोहोचले…

२३ ऑक्टोबर २०१४: मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. यानंतर २३ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून सियाचीनमध्ये पहिली दिवाळी साजरी केली.

११ नोव्हेंबर २०१५: पंतप्रधान मोदींनी पंजाबमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. येथे ते १९६५ च्या युद्ध स्मारकालाही भेट देण्यासाठी आले होते.

३० ऑक्टोबर २०१६: पंतप्रधान मोदी २०१६ मध्ये हिमाचलच्या किन्नौरमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले. येथे त्यांनी भारत-चीन सीमेजवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

१८ ऑक्टोबर २०१७: २०१७ मध्येही पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर ते जम्मू-काश्मीरमधील गुरेझला पोहोचले.

७ नोव्हेंबर २०१८: २०१८ मध्ये, पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील हर्षिलमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.

२७ ऑक्टोबर २०१९: पंतप्रधान मोदींनी २०१९ मध्ये नियंत्रण रेषेजवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. नियंत्रण रेषेवर तैनात जवानांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी राजौरी येथे पोहोचले होते.

१४ नोव्हेंबर २०२०: पंतप्रधान मोदींनी जैसलमेरमधील लोंगेवाला पोस्टवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

४ नोव्हेंबर २०१२१: सन २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा