भाजपच्या संसदीय पक्ष बैठकीत ईशान्येतील विजयाबद्दल पीएम मोदींचा सन्मान

नवी दिल्ली, २८ मार्च २०२३: भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आज मंगळवारी दिल्लीत संसदेच्या ग्रंथालय भवनमध्ये होत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मंत्री पियूष गोयल आणि अन्य नेते सहभागी झाले आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुकांतील विजयाबद्दल भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

पीएम नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे. ६ एप्रिल ते १४ एप्रिल हा सप्ताह सामाजिक न्याय सप्ताह म्हणून करु, अशी माहिती केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी दिलीय. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत समाजकल्याण योजनांवर चर्चा झाली.

मन की बात एप्रिलमध्ये १०० वा एपिसोड पूर्ण करेल. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील खास गोष्टी सांगण्यास सांगितलंय. नुकत्याच झालेल्या ईशान्येतील निवडणुकांतील विजयाबद्दल पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यात आलं, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय. या बैठकीत नुकतेच मंजूर करण्यात आलेलं वित्त विधेयक आणि विरोधकांची सुरू असलेली निदर्शनं यांसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचंही सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा