पुणे, २८ जुलै २०२३ : वाढत्या नागरिकरणा बरोबर पुणे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत होत आहे. पुणे शहरातील वाहतुकीसाठी पीएमपीएल बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्प सुरु झाला आहे. आता पुणे शहरातील वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर हे दोन मार्गही १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मेट्रोने प्रवाशांसाठी सवलत योजनाही जाहीर केली आहे. त्याचा फायदा मेट्रो प्रवाशांना होणार आहे.
पुणे शहरातील सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड असा मार्ग आता सुरु होणार आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवड पासून फुगेवाडीपर्यंत मेट्रो होती. आता ही मेट्रो सरळ न्यायालयापर्यंत येणार आहे. तसेच दुसरा मार्ग वनाज कॉर्नर ते रुबी हॉल सुरु होणार आहे. पिंपरी चिंचवडवरुन पुणे शहरात येण्यासाठी ११ किलोमीटरचा मार्ग खुला होणार आहे. यासाठी चाचणी यशस्वी झाली असुन वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून या मार्गावरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.
पुणे मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे यांनी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना सवलत मिळणार असल्याचे सांगितले आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकिटदरात ३०% सवलत मिळणार आहे. पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळेल. तसेच अन्य नागरिकांना शनिवारी आणि रविवारी सवलत मिळणार आहे. मेट्रोचे भाडे १० ते ३० रुपयांपर्यंत आहे. दर दहा मिनिटांना मेट्रो असणार आहे. कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रोची सेवा असेल.
पुणे शहरातील मेट्रो स्थानकावर वीजेची बचत करण्यात येणार आहे. विजेची बचत करण्यासाठी स्थानकावर सौर ऊर्जा पॅनल बसवले जाणार आहे. पुणे मेट्रोच्या २३ स्टेशनवर सौर पॅनल बसवून वीज निर्माती करण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या वीज बिलात चांगलीच बचत होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर