पिंपरी, २६ जुलै २०२३ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या, पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे ऑनलाईन भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे येथून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आवास योजनेचे भूमिपूजन होणार आहे.
हा कार्यक्रम शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ऑनलाईन होईल. पीएमआरडीए कडून पेठ क्रमांक १२ मध्ये साकारलेल्या गृहप्रकल्पात पहिल्या टप्प्यात ४ हजार ८८३ घरे उभारण्यात आली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ६ हजार ४५६ घरे उभारण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. तर प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ३ हजार ६७ नागरिकांना घरांचे ताबे देण्यात आले आहे. या प्रकल्पातील शिल्लक सदानिकांच्या वितरणासाठी नोंदणी, सोडत व अन्य प्रक्रियेला ऑगस्ट महिन्यात सुरुवात होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर