पीएम ट्रुडो यांनी कॅनडात लागू केली आणीबाणी, लोकांनी शेतकरी आंदोलनाची दिली आठवण करून

कॅनडा, 16 फेब्रुवारी 2022: देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर टीका होत आहे. कॅनडाशिवाय भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्रुडो यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. कोविड लस अनिवार्य करण्यासाठी आणि लॉकडाऊन लागू करण्यासाठी कॅनडामध्ये निदर्शनं सुरू आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून, हजारो आंदोलकांनी ट्रक आणि इतर वाहनांसह राजधानी ओटावामध्ये रस्ते रोखले आहेत, त्यामुळं जनजीवन ठप्प झालंय. सरकारविरोधातील निदर्शने थांबवण्यासाठी जस्टिन ट्रूडो यांनी देशात आणीबाणी जाहीर केलीय.

आणीबाणी कायद्यांतर्गत आंदोलकांना मिळणारा निधी कमी करण्यासाठी ट्रूडो सरकारने हे पाऊल उचललं आहे. ट्रूडो यांनी स्पष्ट केलं की त्यांचे सरकार शांततापूर्ण निदर्शनं थांबवणार नाही. त्याचवेळी त्यांनी आंदोलक ट्रक चालकांवर बेकायदेशीर आणि धोकादायक काम केल्याचा आरोप केलाय.

कॅनडातील ट्रकचालकांना चेतावणी देण्यात आली आहे की त्यांचे ट्रक आंदोलनांमध्ये वापरल्यास त्यांची कॉर्पोरेट खाती फ्रीज केली जातील. कॅनडाचे अर्थमंत्री ख्रिश्चन फ्रीलँड म्हणाले की, नाकेबंदीची बेकायदेशीरपणे चालणारी कारवाई थांबवण्यासाठी ही पावले उचलणं आवश्यक आहे. आंदोलनांमध्ये ट्रक घेतल्यास विमा निलंबित केला जाईल. या निदर्शनांमुळं आपली अर्थव्यवस्था, लोकशाही आणि आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला हानी पोहोचत आहे. हे आम्ही होऊ देणार नाही.

गेल्या 50 वर्षांत कॅनडात आणीबाणीची स्थिती नाही. या आणीबाणीबाबत समीक्षक ट्रुडो यांचा तीव्र निषेध करत आहेत. ट्रुडो यांनी भारताच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि त्यांचं सरकार शांततापूर्ण निदर्शनांसोबत उभे असल्याचे सांगितलं होतं.

ट्रूडो म्हणाले होते, ‘परिस्थिती चिंताजनक आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची आणि मित्रांची आम्हाला काळजी आहे. शांततापूर्ण आंदोलकांच्या हक्कांचौ रक्षण करण्यासाठी कॅनडा सदैव तेथे असेल असे मला म्हणायचं आहे. आम्ही आमच्या चिंतांबाबत भारतीय अधिकाऱ्यांशी बोलत आहोत. आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे.

ट्रुडो यांनी भारताच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, मात्र आता त्यांच्याच देशात निदर्शने होत असताना ट्रूडो यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. यामुळं त्यांना ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर एक व्यंगचित्र शेअर केलं जात आहे ज्यामध्ये ट्रूडो ट्रकवर बसलेल्या शेतकऱ्याला पाठिंबा देताना दिसत आहेत तर दुसर्‍या चित्रात एक ट्रक त्यांच्या पाठलाग करत आहे ज्यावर कर्मा लिहिलं आहे.

हे कार्टून शेअर करताना रॉकी नावाच्या युजरने लिहिलं की, ‘तुम्ही इतरांसाठी जे काही करता ते त्याची परतफेड सुद्धा होते, हे अगदी बरोबर आहे.’

माजी भारतीय मुत्सद्दी कंवल सिब्बल यांनीही कॅनडात आणीबाणी लागू केल्याबद्दल ट्रुडो यांचा तीव्र निषेध केलाय. त्यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये लिहिलं की, ‘लोकशाहीत शांततापूर्ण निषेध करण्याच्या अधिकारावर ट्रूडो आणि इतर पाश्चात्यांसाठी हा धडा आहे. शेतकरी आंदोलनाच्या वेळी भारतातील लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या ऱ्हासाबद्दल बरेच काही बोललं गेलं. ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली हा ढोंगींचा जमाव आहे.
ग्यान झारा हटके नावाच्या ट्विटर हँडलने ट्विट केले की, ‘जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली कॅनडा चीन बनत आहे.’

कॅनेडियन सिव्हिल लिबर्टीज असोसिएशननेही देशात आणीबाणी लागू केल्याचा निषेध केला आहे. असोसिएशनने म्हटलंय की, ‘सरकारने आणीबाणी कायदा लागू करण्याचे मानक पूर्ण केले नाहीत. आणीबाणी कायद्याचा उद्देश ‘सार्वभौमत्व, सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता’ या धोक्यांना सामोरं जाणं हा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा