तिकीट दरवाढीचा परिणाम २० लाख प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरवली

पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आधार असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) यंदाच्या गणेशोत्सवात एक मोठा विरोधाभास अनुभवायला मिळाला आहे. तिकीट दर वाढवल्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असली, तरी प्रवाशांच्या संख्येत तब्बल २० लाखांची घट झाली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीने रात्री उशिरापर्यंत बस सेवा उपलब्ध करून दिली. अनेक मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत प्रवाशांचा प्रतिसाद कमी दिसून आला. गेल्या वर्षी १ कोटी २८ लाख प्रवाशांनी पीएमपी बसने प्रवास केला होता, तर यंदा ही संख्या घटून १ कोटी ८ लाख इतकी झाली आहे.

या घटनेतून स्पष्ट होतं की, बसची संख्या वाढवूनही प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरवली आहे. तरीही, तिकीट दरवाढीमुळे पीएमपीच्या तिजोरीत मात्र मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पीएमपीचे उत्पन्न १७ कोटी ४३ लाख रुपयांवरून वाढून तब्बल २१ कोटी २९ लाख रुपयांवर पोहोचले आहे.

या आकडेवारीवरून एक गोष्ट निश्चित होते की, तिकीट दरवाढीमुळे महसूल वाढला असला तरी प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी सेवा सुधारण्यासाठी आणि नागरिकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी पीएमपी प्रशासनाला नवी धोरणे आखावी लागणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे