भोसरी PMRDA गृहप्रकल्पात पार्किंगचा ‘चोरी’चा पेच!

‘आमचे पार्किंग चोरीला गेले आहे, तेवढे आम्हाला शोधून द्या!’ – असा थेट आणि अनोखा सवाल करत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) भोसरी येथील सेक्टर १२ मध्ये उभारलेल्या गृहप्रकल्पातील संतप्त सदनिकाधारकांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. पुरेसे पार्किंग उपलब्ध नसल्याने रहिवाशांना वाहने उभी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, ज्यामुळे सोसायटीत रोज वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.

‘दोन घरांसाठी एकच पार्किंग’ अशी भयावह परिस्थिती या प्रकल्पात आहे. प्रकल्पाचे टप्प्याटप्प्याने वाटप होत असल्याने सदनिकाधारकांची संख्या वाढली आहे, पण पार्किंगची जागा मात्र अपुरीच राहिली आहे.

प्रशासनाकडून आवश्यक पार्किंग देण्यात आले नसून, प्रत्यक्षात दोन ते तीन सदनिकांसाठी केवळ एकच पार्किंगची जागा असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. स्थानिक रहिवासी अॅड. अतुल कांबळे यांनी या प्रश्नाची गंभीरता व्यक्त केली, “पार्किंगचा प्रश्न गंभीर होत आहे. अधिकारी प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत, म्हणून सभासदांनी पोलीस आयुक्तांकडे अर्ज दिला आहे.”

PMRDA प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार आणि तक्रारी करूनही दखल न घेतल्याने रहिवाशांनी हा ‘चोरी’चा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे आणि पोलीस दलाचे लक्ष वेधले आहे. रहिवाशांच्या तीव्र तक्रारीनंतर PMRDA च्या उपअभियंता रश्मी पाटील यांनी मात्र सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी सांगितले की, “सेक्टर १२ येथील पार्किंगच्या नकाशात बदल करून नव्याने आखणी केली जाईल. सभासदांच्या तक्रारीनुसार पुन्हा आखणी करण्यात आली आहे.”

या गृहप्रकल्पात पार्किंगची समस्या किती विक्राळ झाली आहे, हेच रहिवाशांच्या या ‘पार्किंग चोरी’च्या तक्रारीतून स्पष्ट होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता होऊन, रहिवाशांना त्यांच्या हक्काची पार्किंगची जागा कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे