पीएमआरडीए’चा ऐतिहासिक निर्णय आता ‘काम’ थेट तुमच्या दारात!

जिल्ह्याच्या विकासाला चार नवीन कार्यालयांची गती

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत येणाऱ्या नऊ तालुके आणि ६९७ गावांतील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे! नागरी समस्या आणि बांधकाम परवानग्यांसारख्या कामांसाठी पुणे किंवा आकुर्डी येथील मुख्य कार्यालयात होणारे हेलपाटे आता पूर्णपणे थांबणार आहेत.

नागरिकांची सोय लक्षात घेऊन ‘पीएमआरडीए‘ने चार नवी विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित केली आहेत, ज्यामुळे स्थानिक पातळीवर प्रश्नांची सोडवणूक तात्काळ होणार आहे.

विस्तार आणि मनुष्यबळ

पीएमआरडीए‘च्या कार्यक्षेत्रात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतचा ग्रामीण भाग समाविष्ट आहे. सध्या हवेली तालुक्यात औंध आणि हवेली येथे कार्यालये कार्यरत आहेत. पण आता मुळशीतील चांदे, पुरंदर तालुक्यातील सासवड आणि वाघोली अशा चार महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे.

या प्रत्येक नवीन कार्यालयात स्वतंत्र अधिकारी, अभियंता आणि सहायक महानगर नियोजनकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे उपअभियंता, लिपिक, शिपाई आणि बांधकाम परवानगी विभागातील तज्ज्ञ अधिकारी उपलब्ध असणार आहेत. आवश्यक मनुष्यबळ पुरवल्यामुळे कामांना त्वरित गती मिळणार आहे.

पीएमआरडीए‘चा हा विस्तार नागरिकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण असून, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचणार आहे. जिल्ह्यात आणखी कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याने भविष्यात ही सुविधा अधिक व्यापक होणार आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे