मुंबई, १८ जानेवारी २०२३ : मुंबईमध्ये मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आणि इतरही अनेक नागरिक मुंबई मेट्रोने प्रवास करताना दिसतात. या मेट्रोमुळे विविध ठिकाणी जाणे सुकर झाले आहे. पण, गुरुवारी मात्र, मुंबईकरांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच १९ रोजी मुंबई दौर्यावर आहेत. या दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो सेवा काही काळ बंद राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असून अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो २ A आणि मेट्रो ७ च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, उद्या वर्सोवा-घाटकोपर या मार्गावरील मेट्रो सेवा संध्याकाळी ५.४५ ते ७.३० वाजेपर्यंत बंद असणार आहे. या निर्णयाचा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
दरम्यान, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन गेल्या वर्षीच झाले होते. दोन्ही मार्गांवर पहिल्या टप्प्यात २० किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रो सुरू करण्यात आली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.