नवी दिल्ली, १० जानेवारी २०२१: कृषी कायद्याविरूद्ध दिल्लीच्या सीमेवरील शेतकर्यांचे आंदोलन गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. यावेळी, आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सिंघु सीमेवर ४० वर्षीय शेतकर्याने आत्महत्या केली. पंजाबमधील रहिवासी असलेल्या अमरिंदर सिंग यांनी विष खाल्ले. त्यांना सोनीपत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
४० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या या चळवळीदरम्यान आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. काही शेतकरी थंडीमुळे मरण पावले तर काहींनी आत्महत्या केली. ३ जानेवारी रोजी टिक्री आणि कुंडली सीमेवर काम करणार्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पहिला मृत्यू टिक्री बॉर्डरवर झाला. येथे मृतक शेतकऱ्याचे नाव जुगबीर सिंह असे आहे. कुंडलीच्या सीमेवर दुसर्या शेतकर्याचा मृत्यू झाला. कुलबीर सिंग असे त्याचे नाव आहे.
कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही शेतकऱ्यांच्या मृत्यूसंदर्भात मोदी सरकारला घेराव घातला. निषेधाच्या वेळी शेतकर्यांच्या सतत मृत्यूच्या घटनांवर प्रियंका गांधींनी चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांची मागणी मान्य न केल्याबद्दल त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला असंवेदनशील म्हटले.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान दिल्लीत सीमेवर असलेल्या शेतकऱ्यांचा थंडीमुळे मृत्यू होत आहे. ही गोष्ट मन हेलावून टाकणारी आहे. मीडिया रिपोर्टनुसार आत्तापर्यंत ५७ शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. तसेच अशा वातावरणात शेकडो शेतकरी आजारी देखील आहेत. शेतकऱ्यांचा हा होणारा मृत्यू पाहून देखील दुर्लक्ष करणे म्हणजे सरकार किती असंवेदनशील आहे हे दाखवून देत आहे.
२६ नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू
सरकारने तयार केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीतील सीमेवर आंदोलन करीत आहेत. यादरम्यान शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये ८ चर्चेच्या फेऱ्या झाले आहेत. परंतु, या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. शेतकऱ्यांनी हे तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. परंतु, सरकार हे करण्यास नकार देत आहे. मात्र, या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास सरकार तयार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे