वाघोलीत मंगळसूत्र व मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक.

वढू २९ ऑक्टोबर २०२०: वढू खुर्द येथील दोघांवर कारवाई , लोणीकंद गुन्हे शोध पथकाची कामगिरी. वाघोली येथील बाजारतळ मैदानाजवळ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व दुसऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे. चोरी करणारे दोघेही वढू खुर्द येथे वास्तव्यास असून त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

जयकाल गिरण्या गुदडावत वय १९, आरमान प्रल्हाद नानावत वय २३, दोघेही रा. वढू खुर्द असे पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वाघोली येथील बाजारतळ मैदानाजवळ उर्मिला झेंडे या घरी जात असताना दुचाकीवर आलेल्यांनी झेंडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व पुढे काही अंतरावर वैभव डोंगरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकातील समीर पिलाणे यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्याने व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून यातील संशयीत इसम जयकाल गुदडावत यास जेजुरी येथे वेषांतर करून सापळा रचून शिताफीने पकडले. त्याने आरमान नानावत याच्यासोबत चोरी केली असल्याचे निष्पन्न झाल्याने नानावत यास अटक करण्यात आली आहे.

दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.सदर कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, संतोष कुलथे यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा