गर्भलिंग निदान केंद्र चालवणाऱ्या रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड, आरोपी डॉक्टरसह नर्स ताब्यात

छत्रपती संभाजीनगर, ३ जून २०२३ : छत्रपती संभाजी नगरमध्ये वाळूज परिसरात फिरते गर्भलिंग निदान चालवण्याच्या रॅकेटचा पोलिसांनी शुक्रवारी भांडाफोड केला आहे. धक्कादायक म्हणजे यातील आरोपी डॉक्टर गर्भलिंग निदान चाचणी करणारे साहित्य चक्क चारचाकी गाडीतून घेऊन फिरत होता. फोन केल्यावर तो थेट घरी येऊन गर्भलिंग निदान करण्यासाठी येत होता. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून या डॉक्टरासह त्याच्यासोबत असणाऱ्या नर्सला ताब्यात घेतले आहे. डॉ. सुनील राजपूत, पूजा भालेराव असे ताब्यात घेण्यात आलेल्या डॉक्टर आणि नर्सचे नावे आहेत.

गर्भलिंग निदान करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. परंतु अनेक ठिकाणी पैशांच्या लालसे पोटी चोरून गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याचे प्रकार आतापर्यंत अनेकदा कारवाईतून समोर आले आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अशा अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. आता वाळूज परिसरात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गर्भलिंग निदान चाचणी करणारे साहित्यासह एक चार चाकी गाडी जप्त केली आहे. गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा उजेडात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

वाळूज भागात डॉ. राजपूत हा फिरते गर्भलिंग निदान रॅकेट चालवत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच संबंधित डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर एका महिलेस डॉ. राजपूत याच्याशी संपर्क करायला लावून गर्भलिंग निदान चाचणी करायची आहे, असे सांगितले. सुरुवातीला डॉ राजपूत याने विचार करत थोडा वेळ घेतला. खात्री पटल्यानंतर त्या महिलेस गर्भलिंग निदान चाचणी करण्यास होकार दिला आणि शुक्रवारी वाळूजला चाचणी करण्यास येतो असे ठरले.

यानंतर पोलिसांनी वाळुंज भागात सापळा रचला. गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी डॉ. राजपूत याने सोबत मदतनीस म्हणून पूजा भालेराव हिला सोबत घेऊन दुपारीच वाळूजला पोहोचला. काही वेळाने संबंधित महिलेस घेऊन डॉ. राजपूत व पूजा भालेराव हे दोघे वाळूजला त्या महिलेच्या घरी जाऊन पोर्टेबल मशिनच्या सहाय्याने गर्भलिंग निदान चाचणी सुरु केली. यावेळी बाजूलाच दबा धरुन बसलेल्या पोलीस पथकासह वैद्यकीय पथकाने लगेच छापा मारुन डॉ. राजपूत आणि पूजा भालेराव या दोघांना ताब्यात घेतले.

संबंधित डॉक्टर आणि नर्स वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु आतापर्यंत लपूनछपून गर्भलिंग निदान चाचण्या करण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आले आहेत. पण चक्क फिरते गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.यामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा