Police Commissioner Employment Initiative: पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या प्रेरणादायी उपक्रमातून रहाटणी येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या तब्बल १३६ गुणवंत पाल्यांची पहिल्याच फेरीत निवड झाली आहे. पोलीस कुटुंबीयांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आयुक्तांच्या दृष्टिकोन आणि प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे.
एसएनबीपी शाळेत झालेल्या या रोजगार मेळाव्यात २५० पोलीस पाल्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या मेळाव्यात नामांकित अशा ३७ विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आणि मनुष्यबळ विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुलाखती घेतल्या. पहिल्या फेरीतच १३६ पाल्यांची निवड झाल्याने पोलीस कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम मुख्यमंत्री १०० दिवसीय कृती कार्यक्रमाचा भाग होता. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, विशाल गायकवाड आणि सहायक आयुक्त सुनील कुराडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

याप्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले, “पोलीस पाल्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोलीस पालकांनी मेहनत, शिस्त आणि जबाबदारीचे पालन करून केवळ स्वतःचाच नव्हे, तर ज्या कंपनीत ते रुजू होतील, तिचाही उत्कर्ष साधावा.”
टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज, ह्युंदाई आणि लुमॅक्स यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सक्रिय सहभाग घेतला. अजून ५२ उमेदवारांची निवड मुलाखतीच्या पुढील फेऱ्यांमध्ये होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आकडा आणखी वाढू शकतो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी उपक्रमाची माहिती दिली, तर उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी आभार मानले. पोलीस आयुक्तांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक पोलीस कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे