औरंगाबाद, दि.३ जून २०२० : लॉकडाऊनच्या काळात दुचाकी व चारचाकी वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करुन पोलीस विभागातर्फे २ कोटी २६ लाख ८४ हजार ३०० रुपये एवढी रोख रकमेची वसुली करण्यात आली होती.
सर्व व्यापार, बाजारपेठ, उद्योगधंदे बंद असल्याने स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी नागरीक हतबल झालेले आहेत. म्हणुन सदरील प्रकरणाचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन त्यांना मदतीचा हात म्हणून पोलीस विभागातर्फे वसुल करण्यात आलेली रक्कम वाहनधारकांना परत देण्यात यावे, अशा आशयाचे पत्र खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना दिले आहे.
पत्रामध्ये पुढे नमूद करण्यात आले की, कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाला नियंत्रित करण्यासाठी सध्या औरंगाबाद जिल्ह्यात शासनाकडून लॉकडाऊन व संचारबंदीची उपाययोजना राबविण्यात आलेली आहे. या काळात पोलीस विभागाने अत्यंत मोलाची कामगीरी केलेली असून अभिनंदनीय आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यापार, बाजारपेठ व उद्योगधंदे बंद असल्याने सर्व नागरीकांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे. त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी सामाजिक संस्थावर अवलंबुन राहावे लागत आहे. तसेच त्यांना कोणत्याही ठिकाणाहुन आर्थिक मदत मिळणे अत्यंत कठिण झालेले आहे. नागरीकांवर आता उपासमारीची वेळ आलेली असुन नागरीक त्रस्त झालेले आहेत.
याच दरम्यान अनेक नागरीकांच्या अशा तक्रारी आहेत की, जिवनावश्यक वस्तु खरेदी करण्यास संचारबंदीच्या काळात काही वेळेकरिता जी सुट देण्यात आली होती. त्या दरम्यान सुध्दा त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करुन पावती देण्यात आलेली आहे तसेच अनेक ठिकाणी असे प्रकरण सुध्दा घडलेले आहे की, सुट दरम्यान वाहनधारक जात असतांना त्यांचे फोटो काढन त्यांना सुध्दा पावती देण्यात आलेली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: