आगरतळा, १९ फेब्रुवारी २०२३ : रेल्वे पोलिस दलाने आगरतळा रेल्वेस्थानकावर १३ परदेशी नागरिकांसह १६ जणांना बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावररून ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी आज सकाळी याबाबत माहिती दिली. गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस स्टेशन प्रभारी राणा चटर्जी यांनी सांगितले, की ‘आरपीएफ’ने तीन मुलांसह १३ रोहिंग्यांना अशा एकूण १६ जणांना आगरतळा रेल्वेस्टेशनवरून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय मध्यस्थांनी रोहिंग्यांना आणि बांगलादेशी नागरिकांना त्रिपुरामध्ये प्रवेश करण्यास मदत केली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोंपीमध्ये मधुपूर येथील अभिजित देब नावाच्या मध्यस्थाचाही समावेश आहे. हे सर्वजण बांगलादेशातून अवैधरीत्या भारतात दाखल झाले होते. आगरतळा रेल्वेस्थानकातून सकाळी ८.०५ वाजता कंचनजंगा एक्स्प्रेसने सर्वजण कोलकात्याला जाणार होते.
आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांच्यावर विशेष गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींची कसून चौकशी करीत त्यांचा अवैधरीत्या येण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर