पिंपरी-चिंचवड, २२ ऑक्टोबर २०२०: पुण्यातील खेडमध्ये ७ ऑक्टोबरला मेफेड्रोन आणि रोकड असा २० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. सुरुवातीला फार्माशी संबंधित ५ आरोपींकडून २० कोटीचं २० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन व्यक्तीसह तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर रांजणगाव येथील बायोटेक कंपनीत मेफोड्रोन तयार केले होते. ती कंपनी सील केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेल्या मेफेड्रॉन ड्रग्जचं कनेक्शन मुंबईपर्यंत पोहोचलं आहे. पण, बॉलिवूडपर्यंत अद्याप पोहचू शकलेलं नाही. याचा मुख्य सूत्रधार तुषार काळे हा मुंबईचा असून तो छोटा राजन गँगशी संबंधित आहे. तर नायजेरियन नागरिक जुबी उकोडोला वसई येथून अटक करण्यात आली. आत्ता पर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार तुषार सूर्यकांत काळे (रा. बोरीवली) आणि राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई) आणि नायजेरियन व्यक्ती झुबी इफनेयी उडोको ही आत्ता अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय २५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा. झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय ३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याआधी ११२ किलो मेफेड्रॉन ड्रग्जची विक्री झाल्याचं तपासात समोर आलं. आधी २० कोटींचे मेफेड्रॉन तर आता ८५ लाखांची रोकड आणि ७५ लाखांची जमीन जप्त करण्यात आली आहे. औषधांच्या नावाखाली हा गोरखधंदा सुरु होता, हे आता अटकेतील आरोपींवरुन सिद्ध झालं आहे.
आरोपी तुषार काळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील कुख्यात छोटा राजन या गुन्हेगारी टोळीशी त्याचा संबंध आहे. नायजेरियन आरोपी झुबी इफनेयी उडोको हा एका अमली पदार्थांच्या प्रकरणात कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा भोगून आला आहे. त्याने त्याच्या व्हिसामध्ये देखील छेडछाड केली असल्याचे समोर आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे