पुरंदर, दि. ३० ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी पोलिसांनी विना मास्क, रस्त्यावर थुंकणे व वाहतूक नियम भंग करणे या प्रकरणी धडक कारवाई करत सुमारे ९० हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे. काल दि. २९ रोजी सासवड व जेजुरी पोलीस स्टेशनच्या विविध पथकांनी सासवड व जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील अनेक नागरिक विना मास्क फिरताना मिळून आले आहेत. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली आहे. सासवडमध्ये विना मास्क फिरणाऱ्या २२९ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३६,८०० रुपये दंड वसूल केला आहे. तसेच मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत ५० नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १५,२०० रुपये दंड वसूल केला आहे.
जेजुरीमध्ये शनिवार दि. २९/०८/२०२० रोजी विनामास्क १६२ केसेस करून लोकांकडून ३२,४०० रुपये दंड, तर वाहतूक संबंधित ३० केसेस करून त्यांच्याकडून ६,००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. असे पुरंदर तालुक्यातील सुमारे ९०,४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या सासवड, जेजुरीसह ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून विना मास्क फिरणे तसेच रस्त्यावर फिरणे रस्त्यावर थुंकणे या गोष्टी कटाक्षाने टाळावयाच्या आहेत. प्रशासनाला दंडात्मक कारवाईची गरज भासली नाही पाहिजे. याउपर लोकांनी प्रशासनाचे आदेश न पाळल्यास अधिक कठोरपणे कारवाई केली जाईल आणि ती गरजेची आहे असे मत भोर – पुरंदर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी व्यक्त केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे