पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले निलंबित, मराठा समाजाबद्दल आक्षेपहार्य वक्तव्य आले अंगलट

जळगाव, १५ सप्टेंबर २०२२ : मराठा समाजा विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी अखेर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर पोलीस अधीक्षकांकडून कारवाई करण्यात आली आहे. बकाले यांची नियंत्रण कक्षा मध्ये बदली करण्यात आली होती. परंतु रात्री उशीरा त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बकाले यांनी मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेऊन जिल्हाचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्याकडून एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री बदली करण्यात आली होती. परंतु बुधवारी दिवसभरात मराठा समाजातील मान्यवरांसह मराठा संघटनांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेऊन बकाले यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, विनोद देशमुख आदींकडून कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे मागणी करण्यात आली होती. मराठा संघटना आणि समाजातील रोष यामुळे गुरुवारी रात्री उशीरा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी किरणकुमार बकाले यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

दरम्यान मराठा समाजावर अत्यंत हीन स्वरूपाचे भाष्य करणाऱ्या नीच प्रवृत्तीचा पोलीस निरीक्षक किरण बकाले याला तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली होती. पोलीस प्रशासन व गृह विभागाकडून तात्काळ निलंबन नाही झाले, तर आम्ही बकाले कामाला येणार नाही याची व्यवस्था करणार आहोत. असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी दिला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा