अजित पवार, धनंजय मुंडे यांना पोलिसांची नोटिस

मुंबई, ३० ऑगस्ट २०२०: उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे नेते सचिन अहिर, यांच्यासह अकरा जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसानी नोटीस बजावली आहे. या प्रकरणात वरील सर्व बड्या नेत्यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

२०१८ साली जमावबंदी कायद्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या सर्व नेत्यांनी मंत्रालयाच्या समोर तत्कालीन सरकारच्या विरोधात आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी या सगळ्यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या विरोधात दोषारोपपत्र शिवडी न्यायालयातून दोषारोपांची प्रत घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी या सर्वांना कामकाजाच्या वेळेत न्यायालयात हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार व बरेच जण सध्याच्या सरकारमध्ये वजनदार मंत्री असल्याने त्यांना पोलिसांची नोटीस दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा