पोलीस कर्मचाऱ्यास टोळक्याची मारहाण

उरुळी कांचन, दि.२६ मे २०२० : हवेली तालुक्‍यातील उरुळी कांचन येथे तळवाडी चौकात किरकोळ कारणावरून एका तरुणास होत असलेली मारहाण रोखण्यासाठी गेलेल्या जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलातील एका कर्मचाऱ्यास आठ ते दहा जणांच्या टोळक्‍याने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवार (दि. २५) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तसेच, या टोळक्‍याने तळवाडी चौकातील एका महिलेसही शिवीगाळ केली आहे.

उरुळी कांचन येथील या घटनेत सोमनाथ शिवाजी चितारे (रा. उरुळी कांचन) या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण झाली आहे. ते सध्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी शुभम ऊर्फ दाद्या अशोक कानकाटे (रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मूळ ता. हवेली) व अजय रामचंद्र ठवरे (रा. उरुळी कांचन) या दोघांसह आठ अनोळखी, अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कानकाटे व ठवरे या दोघांना अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे.

याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात शिंदवणे रस्त्यावर सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका तरुणास काही लोक बेदम मारहाण करत असल्याची खबर उरुळी कांचन पोलिस चौकीत एकाने फोनवरून दिली. या माहितीची खातरजमा करण्याच्या उद्देशाने सोमनाथ चितारे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्या ठिकाणी कानकाटे व ठवरे व त्यांचे आठ ते दहा सहकारी लाकडी दांडके व लाथाबुक्‍क्‍यांनी नीलेश दत्तात्रेय भोसुरे (वय २७, रा. धानोरे, ता. शिरूर) या तरुणास मारहाण करत असल्याचे आढळून आले.

भांडण रोखण्यासाठी पोलिस गणवेशात असलेले सोमनाथ चितारे पुढे गेले असता शुभम कानकाटे व अजय ठवरे व त्यांच्या साथीदारांनी चितारे यांच्यावर हल्ला चढविला. ते पाहून घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कानकाटे व ठवरे यांनी मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून घटनास्थळावरून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. तसेच, कानकाटे याने चितारे यांना जीवे मारण्याचीही धमकीही दिली. मात्र, चितारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या हिमतीने कानकाटे व ठवरे यांना पकडले. मात्र, त्यांचे उर्वरित साथीदार पळून गेले आहेत. व पुढील तपास लोणी काळभोर पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा