गोल पोस्ट गुन्हा कल्याण्यात अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर पोलीसांचा छापा

कल्याण्यात अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर पोलीसांचा छापा

कल्याण, ३१ जुलै २०२० : कल्याणमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तीन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या त्रिकुटाकडून तब्बल ५ लाख २२ हजार रुपये किंमतीचे अफीम हस्तगत करण्यात आली आहे अशी माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली. सुरेश नारायणलाल कुमहार, सोमाराम प्रल्हादजी प्रजापती आणि भरत गमनाराम चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत.  

कल्याणमधील दुर्गाडी किल्ला भागात काही जण अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. त्यानूसार पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पी.एस.सानप, हवालदार टी. के.पावशे, पोलीस नाईक नितीन भोसले, सचिन साळवी, साबीर शेख, जी.एन.पोटे, राजाराम सांगळे आदींच्या पथकाने दुर्गाडी परिसरात कट तयार करून या तिघांना अटक करण्यात आले आहे. पहाटे ३.३० च्या सुमारास जुन्या दुर्गाडी पुलावरून हे तिघे जण बाईकवर येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

या तिघांचीही तपासणी केली असता सोमाराम प्रजापतीकडे सुमारे १ किलोपेक्षा अधिक अफीम आढळून आले. याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर राजस्थानमधून कल्याणामध्ये विक्रीसाठी हे अफीम आणल्याचे त्यांनी सांगितले. या अफीमची बाजारात ५ लाख २२ हजार रुपये इतकी किंमत असून ५०० रुपये प्रतिग्रॅम अशी त्याची विक्री होत असल्याची माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली. या तिघांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी दिली. या तिघांवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल .

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version