पुरंदर, दि. १८ मे २०२०: आपण काम करत असताना आपल्या कामाचे कौतुक सर्वचजण करतील किंवा सर्वजण सांगितलेले लगेच ऐकतील असे नाही. लाॅकडाऊनच्या काळात लोकांच्या बेशिस्तपणाचा सामना पोलिसांनाही करावा लागतोय. हे लोक पोलिस पाटलांस सुध्दा सौजन्याने वगतीलच अस नाही. पण गेल्या दोन महिन्यांत ग्रामीण भागात कोरोना न येण्यासाठी पोलिस पाटलांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यामुळे कोणी काही म्हणो, आपण लोकहिताचे काम करताना मागे हटायचे नाही. अशा सुचना जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी पोलिस पाटलांना दिल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यांत पोलिस पाटलांनी केलेलं काम व त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याबाबत व त्यांना मास्क व सॅनिटायजर देण्यासाठी जेजुरी पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिस पाटलांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुंजीरपाटील, तालुका कार्याध्यक्ष मोहन इंगळे, राजेंद्र भास्कर, ज्ञानेश्वर तांबे, दिनेश जाधव, दिपक जाधव, मनिषा भोसले, प्रियंका चव्हाण, स्वाती भोसले, उज्वला कोलते ,मनिषा म्हस्के, श्रीकांत राणे आदींसह सर्व गावचे पोलिस पाटील उपस्थित होते. यावेळी पोलिस पाटलांनी गावात काम करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. लोकांना कितीही समजावले तरी लोक कोणतीही दक्षता घेत नाहीत. शहरातून आलेले लोक व त्यांचे नातेवाईक कोरोनटाईनचे कोणतेच नियम पाळत नाहीत. त्यांना समजावण्यास गेल्यास अनेक वेळा वाद घालतात. त्याच बरोबर आमच्या जिल्हा पातळीवरील वरीष्ठ अधिका-यांबरोबर ओळखी आहेत. काय करायचे ते करा असे म्हणून आडेलट्टुची भुमीका घेत असल्याचे पोलिस पाटलांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी याबाबात उदासीन असल्याने सांगण्यात आले. यावेळी माने म्हणाले की, कोणी पालन करो किंवा न करो तुम्हाला काम करायचे आहे. हे काम करत असताना पुणे मुंबई सारख्या शहरातून आलेल्या लोकांपासून सोशल डिस्टंसिंग ठेवा.गावाच्या सुरक्षेबरोबर स्वतःच्या सुरक्षेकडे सुद्धा लक्ष द्या.
यावेळी बहुजन हक्क परिषद संस्थापक अध्यक्ष सुनिल धिवार यांनी पोलिस पाटलांना मास्क सॅनिटायजर दिले. कोरोना विरोधात लढत असताना धिवार यांनी पाटलांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल पोलिस पाटील संघटनेच्यावतीने पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे