मुंबई, १० सप्टेंबर २०२० : डाळिंबाचं आगार समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये डाळिंबाची निर्यात सुरु होणार असल्याचं राज्य कृषी पणन मंडळातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी विकासाचं नाव दालन खुलं होणार आहे.
राज्यातील चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची ऑस्ट्रेलियात निर्यात व्हावी म्हणून गेल्या वर्षभरापासून राज्य कृषी पणन मंडळातर्फे सुरु असलेले प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत. सध्या राज्यातून ऑस्ट्रेलियात केवळ हापूस आंब्याची निर्यात होते. ऑस्ट्रेलियातील नियमानुसार तिथल्या निर्यातीसाठी फळांवरील काही चाचण्या आवश्यक असतात आणि गेल्या वर्षभरापासून डाळिंबावर सुरु असलेली ही चाचणी प्रक्रिया यशस्वी झाली आहे.
गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांनी किमान दोन ते तीन वेळा डाळिंबावरील विकिरण प्रक्रिया केंद्राला भेट देऊन पाहणी देखील केली आहे. येत्या काही काळातच ही निर्यात सुरु होईल असा विश्वास पणन मंडळातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी