सुमारे ४० कोटी रुपये किमतीच्या जमिनीची २ कोटी ५० लाखांत मिळकत पत्रिकेवर नाव नसताना ताबा साठेखत

फलटण, ३० नोव्हेंबर २०२२ : फलटण शहरातील मोक्याची बालाजी देवस्थान ट्रस्टला अर्पण केलेली व सध्या फलटण नगरपालिकेचा आरक्षित भूखंड म्हणून मिळकत पत्रिका असलेली सुमारे ४० कोटी रुपये बाजार मूल्य किंमतीचा सुमारे १९ हजार चौरस फूट भूखंड फलटण १ सह दुय्यम निबंधक यांच्या प्रतापाने नाममात्र २ कोटी ५० लाखांत शासनाची फसवणूक करून विक्री केल्याची घटना घडली असून, सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे जमीन विकणाऱ्या लोकांचे मिळकत पत्रिकेवर नाव नसताना सह दुय्यम निबंधक यांनी जमीन खरेदी करणाऱ्या पार्टीच्या नावे कधीही रद्द न होणारे कुलमुख्त्यारपत्र व ताबा साठेखत केले असल्याने संपूर्ण फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, की शहरातील बालाजी देवस्थान ट्रस्टला अर्पण केलेली व फलटण नगरपरिषदेचा आरक्षित भूखंड सिटी सर्व्हे नंबर ६४४७, प्लॉट नंबर ७८ व ७९ (अ ) मिळकत फलटण नगरपालिकेच्या आरक्षण भूखंडापैकी एक भूखंड असून, यावरती न्यायालयामध्ये खटला सुरू असून, त्यावर अजून कोणताही निर्णय झाला नसून या सर्व्हे नंबरच्या भूखंडावरती मिळकत पत्रिकेवरती जमीन विकणाऱ्या पार्टीचे नाव नसताना व या जमिनीचे नगरपालिकेच्या हद्दीतील मूल्यांकन सुमारे ८ कोटी रुपये असताना या जमिनीचा ताबा साठेखत व कुलमुख्त्यारपत्र झाले आहे.

याविरोधात काही लेखी तक्रार दाखल होऊन सदर दस्त नोंद करू नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावरती दुय्यम निबंधक यांनी लेखी उत्तर दिले असून, त्यात त्यांनी सदर जमीन इनाम वर्ग ३ ची असल्याबाबत कोणताही उतारा विक्री करणाऱ्या पार्टीने दस्ताबरोबर जोडला नसून या भूखंडावरती न्यायालयात सुरू असलेल्या रिट पिटिशन याचिकेवरती निकाल झाल्याची प्रतसुद्धा जोडली नसल्याचे व मिळकत पत्रिकेवर विक्री करणाऱ्या पार्टीचे नाव नसल्याचे लेखी उत्तर दिले असून जर दुय्यम निबंधक यांनी या जमिनीचे शासकीय मूल्यांकन ८ कोटी रुपये होत असताना व त्याचं बाजार मूल्य सुमारे ४० कोटी रुपये होत असताना नाममात्र २ कोटी ५० लाख रुपयांमध्ये ताबा साठेखत कोणत्या आधारे केले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

या व्यवहारांमध्ये प्रचंड मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याची चर्चा सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये सुरू आहे. सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत; तसेच दुय्यम निबंधक कार्यालय फलटण यावरती सातारा सहा जिल्हा निबंधक कार्यालय कोणती कार्यवाही करणार, यावरती सर्व फलटणनगरीतील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. या सर्व प्रकरणाबाबत नगरपालिकेकडे विचारणा केली असता, सदर बाब गंभीर असून चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा