लसीकरणावरून मोदींवर टीका करणारे दिल्लीत पोस्टर, २५ एफआयआर, अनेक जणांना अटक

नवी दिल्ली, १७ मे २०२१: कोरोना व्हायरस लसीसंदर्भात दिल्लीतील बर्‍याच भागात पंतप्रधान मोदींवर टीका करणारे पोस्टर लावण्यात आले आहे, ज्या विरोधात दिल्ली पोलिसांची कारवाई सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २५ एफआयआर नोंदविले आहेत. तर असे पोस्टर लावणाऱ्यांपैकी अनेक जणांना अटक देखील करण्यात आलीय. अटक केलेल्यांमध्ये मजूरही आहेत. रिक्षावाल्यांबरोबरच प्रिंटिंग प्रेस वाल्यांनाही अटक करण्यात आलीय.

दिल्लीतील कल्याणपुरी भागातून चार मजुरांना अटक करण्यात आली. या लोकांना पोस्टर लावण्यासाठी देण्यात आले होते. यासाठी त्यांना पैसे मिळत होते. मजुरांच्या म्हणण्यानुसार हे पोस्टर कोणी लावण्यास सांगितले याबाबत त्यांच्याकडं कोणतीही माहिती नाही. त्यांच्या हातात पोस्टर आणि पैसे आले, त्यानुसार ते हे पोस्टर ठीक-ठिकाणी लावत गेले.

ही पोस्टर्स खजुरी, कल्याणपुरी, दयालपूर, भजनपुरा, मंगोलपुरी, जुनी दिल्ली, ख्याळा, मोती नगर, कीर्ती नगर, मंगोलपुरी, निहाल विहार, रोहिणी, कल्याणपुरी आणि दिल्लीतील एमएस पार्क येथे लावण्यात आली होती. पोस्टरमध्ये लिहिलेलं होतं, “मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांच्या हक्काची लस परदेशात का पाठवली”. लावलेल्या काळ्या पोस्टरवर फक्त या ओळी लिहिल्या गेल्या. हे पोस्टर कोणी छापले त्या व्यक्तीचं नाव नाही.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पीडीपीपी कायदा, आयपीसी १८८ आणि प्रेस अँड रजिस्ट्रेशन बुक्स अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. अनेक ठिकाणाहून होर्डिंग्ज आणि पोस्टर्सही पोलिसांनी जप्त केली आहेत. हे पोस्टर्स लावण्यावरून दिल्ली पोलीस तपास करत आहे. त्याचबरोबर यामध्ये राजकीय हेतू आहे का हे देखील तपासलं जात आहे.

पोस्टर लावण्यासाठी अटक करण्यात आल्याबद्दल राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीदेखील हे पोस्टर्स आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत मोदींना आव्हान केलंय की, ‘आम्हाला देखील अटक करा’. प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरील प्रोफाईल पिक काढून त्याऐवजी हेच पोस्टर ठेवलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा