मुंबई, ८ ऑगस्ट २०२०: गेल्या दीड – दोन महिन्यांपासून सुशांत आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. बॉलीवुड मधल्या सेलिब्रिटींपासून ते राजकारणापर्यंत सर्वच ठिकाणी या प्रकरणावरून हेवेदावे सुरू आहे. इतकेच काय तर आता दोन राज्य सरकारांमध्ये देखील यावरून हेवेदावे सुरू झाले आहे. प्रत्येक येणाऱ्या दिवशी नवीन खुलासा होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखीन वाढत जात असताना दिसत आहे.
सुशांत सिंग राजपूत यांचे आत्महत्या करण्यापूर्वी त्याची पूर्व मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. आता तिच्या मृत्यूवरदेखील संशय व्यक्त केला जात आहे. दिशा सालियन आणि सुशांतच्या आत्महत्येचा एकमेकांसोबत काही संबंध आहे का? याचा पोलीस शोध घेत आहे. नुकताच दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात तिच्या अंगावर कपडे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सुशांतची पूर्व मॅनेजरच्या घरी ८ जून रोजी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये ती खूप खुश असल्याचा व्हिडिओ देखील तिने एका व्हाट्सअप ग्रुप वर शेअर केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या दिवशी तिने ती राहत असलेल्या बिल्डिंगच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सदर व्हिडीओ हा आठ जून रोजी रात्री ११.४८ मिनिटाला पोस्ट केला गेला होता. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मित्रांसोबत डान्स करताना दिसली आहे. या पार्टीत केवळ सहा जण सहभागी झाले होते. त्यात कोणताही राजकीय नेता उपस्थित नव्हता. दिशाचे मित्र या पार्टीत होते.
या सर्व घडामोडींमध्ये आता आज तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्ट मधील आठव्या क्रमांकाच्या मुद्द्यांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, तिच्या मृतदेहावर कोणतेही कपडे नव्हते. तसेच ज्यावेळी दिशाचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता, त्यावेळीही तिच्या अंगावर कपडे नव्हते, असे यात नमूद करण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी