सीबीएसई दहवी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना स्थगिती

30

नवी दिल्ली: देशभरात कोरोना विषाणूचा वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालयाच्या दहवी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ मार्च ते ३१ मार्च दरम्यान घेण्यात येणाऱ्या वेळापत्रक स्थगित करण्यात आले असून परिस्थितीनुसार ३१ मार्चनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय विद्यालयाच्या प्रशासनाने म्हटले आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अलीकडेच सीबीएसईला यासंदर्भातील निर्देश दिले होते. परीक्षा महत्त्वाच्या आहेतच; पण विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा त्याहून अधिक महत्त्वाची आहे, असा पवित्रा मंत्रालयाने घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्देशांवर मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व त्यानुसारच मंडळाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला.

विद्यार्थी वेगवेगळ्या शहरातून परीक्षेसाठी येत असतात. देशात वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्याच्या उद्देशाने परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार परीक्षात बदल करण्यात आले आहेत.