ठाणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वर बुधवारी रात्री पॉवर ब्लॉक

5

मुंबई, २२ ऑगस्ट २०२२ : मुंबईकरांसाठी लोकल हा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आज एक महत्त्वाची बातमी आहे. बुधवारी रात्री ११.५५ वाजल्यापासून ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वर पॉवर ब्लॉक असेल. मिळालेल्या माहितीनुसार, पादचारी पुलाचे ५ मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी हा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

यादरम्यान काही लोकल ट्रेन उशिराने धावतील आणि काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे ४.५५ वाजेपर्यंत हा पॉवर ब्लॉक राहील. त्यामुळेच प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अप ट्रान्स हार्बर मार्ग आणि पाचव्या रेल्वे मार्गावर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुलाचा गर्डर मोल्ड करण्यासाठी १४९ टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईकडे जाणारी हावडा- मुंबई एक्सप्रेस, आदिलाबाद – मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, चेन्नई- मुंबई एक्सप्रेस आणि पुद्दुचेरी-दादर एक्सप्रेस सहाव्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १०-१५ मिनिटे उशिराने धावतील. याशिवाय मुंबई- मडगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस, दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर आणि तेजस एक्स्प्रेस पाचव्या मार्गावरून धावणार आहेत. बुधवारी रात्री ९.५४ वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटणारी १५ डब्यांची कल्याण लोकल आणि रात्री ११.०५ वाजता कल्याणहून सुटणारी सीएसएमटी १५ डब्यांची लोकल रद्द करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा