पशुपालकांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना परिवर्तनाचं साधन बनेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, १० सप्टेंबर २०२० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे उद्घाटन करण्यात आलं. बिहार मधून या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी ही सुमारे २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीची ही पथदर्शी योजना आहे. त्यात बिहारमध्ये एक हजार ३९० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे २०२४-२५ पर्यंत देशातील मत्स्य उत्पादन ७० लाख टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ठ आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की पशुपालन आणि शेती क्षेत्रात महिला आणि युवकांना मोठी संधी आहे. त्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं आता सोपं झालं आहे. त्याचा लाभ घेऊन महिला आणि युवकांनी आपलं आणि आपल्या परिसराचं भवितव्य बदलावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिहारच्या विविध भागातील पशुपालक आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

तत्पूर्वी पशुपालकांसाठी उपयुक्त ई-गोपाला ऍपचा आरंभ देखील मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. बिहारमधील डॉ. राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठातील मत्स्य उत्पादन तंत्रज्ञान केंद्राचेही त्यांनी उदघाटन केलं. या योजनेमुळ मत्स्यशेती क्षेत्राचा कायापालट होण्यास मदत होईल तसच आत्मनिर्भर भारत अभियानालाही यामुळं हातभार लागेल असं मोदी यांनी सांगितलं.

या योजनेमुळे मत्स्यशेती क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल, तसेच यातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा