दौंड: कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रकल्पांवर प्रदूषण मंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने तक्रार झालेल्या प्रकल्पांची त्रेधा तिरपीट उडाली आहे. रासायनीक सांडपाणी उघड्यावर सोडल्याच्या कारणाने विश्वा लँबोरेटारी प्लॉट नं. डी-३५ या कंपनीला देखील उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या हार्मोनी वरील कारवाई नंतर हि दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या दबावाने प्रदूषण मंडळाला गांभीर्याने दखल घ्यावी लागली असून त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पावर कारवाई करण्यात येत आहे. अत्यंत घातक रसायनांच्या प्रक्रियेतील सांडपाणी उघड्यावर सोडणे, घातक घण कचरा कंपनी परिसरात साठवणे अश्या विविध कारणांचा आधार घेत हि कारवाई करण्यात येत आहे. कुरकुंभ पांढरेवाडी येथील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून दोषी प्रकल्पांना कठोर कारवाई ला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत प्रदूषण विभागाने दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून कुरकुंभ व परिसर रासायनीक सांडपाणी हवेतील प्रदूषणाच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे. परिसरातील नैसर्गिक स्त्रोत मोठ्या प्रमाणात दुषित झाल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत.बेजबाबदारपणे प्रकल्प चालवून उत्पादनाचा खर्च कमी करून नफ्याने आपले खिसे भरण्याचा प्रयत्न होत असल्याने ह्या समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण मंडळाने दिलेल्या नियमावलीचे पालन हे प्रकल्प करीत नसल्याने अन्य प्रकल्प व्यवस्थापनाला देखील याचा त्रास होत आहे. परिणामी औद्योगीक क्षेत्रातील प्रश्न नेहमीच धुमसत राहत आहेत.
याबाबत कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असुन औद्योगीक क्षेत्रातील प्रकल्प चालकांनी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेवूनच प्रकल्प चालवण्याचे आवाहन केले आहे. तर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रदूषण मंडळाच्या अक्शन मोडवर प्रकल्प चालक धास्तावले आहेत. त्यामुळे भविष्यात तरी बेकायदेशीरपणे प्रकल्प चालवणे बंद करून प्रदूषणाच्या आखुन दिलेल्या नियमावलीचे पालन होईल याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.