प्रकाश आंबेडकर आज राहुल गांधींशी चर्चा करणार, शनिवारी नागपूरहून दिल्लीत पोहोचले

नागपूर, ९ जुलै २०२३ : वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर शनिवारी सायंकाळी नागपूरहून दिल्लीला रवाना झाले. दोन दिवसांनंतर काँग्रेसचे सरचिटणीस ( संघटन) के. वेणुगोपाल यांची भेट घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आंबेडकर यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे अटकळांना उधाण आले असून मिळालेल्या माहितीनुसार, ते रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

ही चर्चा युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी असल्याचे बोलले जातेय. महाराष्ट्रातील बदलते राजकारण पाहता काँग्रेस- वंचित आणि शिवसेना (ठाकरे गट) युती निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. पवार हे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आहेत. आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आघाडीबाबत पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सहभागी झाल्याने नवे समीकरण तयार झाले आहे.

राज्यातील बदलते समीकरण पाहता काँग्रेसनेही सावध आणि आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. वंचितांसह मतदारांचा मोठा वर्ग आपल्या बाजूने घेऊन जोरदार निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात ज्या जागा आम्ही गमावल्या त्या जागा द्या. आंबेडकरांनी गेल्या वेळी काँग्रेसमध्ये जाण्याचे टाळले होते. आता नव्या समीकरणात काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजरा असतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा